नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उद्या (सोमवारी) आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (Indepandance Day) 347 पोलिसांना शौर्यसाठी पोलीस पदक (PMG) प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 108 पदके जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र 42 पदकांसह तर छत्तीसगड 15 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.आज (रविवारी) डीजीपी दिलबाग सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व जवानांना पदके देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यालयाने दिली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य दलातील एकूण 1,082 पोलीस कर्मचार्यांना शौर्यसह सेवा पदकांच्या विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. राज्याच्या पोलीस दलांपैकी महाराष्ट्राला 42 शौर्य पदके प्रदान करण्यात आली.
शौर्यसाठी 347 पोलीस पदके, विशिष्ट सेवेसाठी 87 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 648 पोलीस पदके प्रदान करण्यात आली. शौर्यासाठी 347 पदकांपैकी 204 जवानांना जम्मू-काश्मीरमधील शौर्यपदक, 80 पोलिसांना वामपंथी अतिरेकी किंवा नक्षल हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी शौर्य दाखविल्याबद्दल आणि 14 पोलिसांना ईशान्य प्रदेशात शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी सर्वाधिक 109 शौर्य पदके केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांना 108, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) 19 आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांना प्रत्येकी सहा पदके मिळाली.