लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रक्तदान शिबिरास तब्बल ३०० रक्तबाटल्या संकलित करण्यात आल्या आहेत. या शिबिराचे आयोजन संत निरंकारी मिशन शाखेच्या वतीने लोणी काळभोर येथील संत निरंकारी सत्संग भवनात आज रविवारी (ता.४) आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी, आव्हाळवाडी सेक्टरचे दत्तात्रय सातव, मांजरी विभागाचे मुखी रोहिदास घुले, लोणी काळभोर विभागाचे मुखी राहुल काळभोर, उरुळी कांचन विभागाचे मुखी किशोर लोणारी, मार्गदर्शन रामदास गवारे, सर्व अनुयायी त्यांच्या सर्व पथकाने उत्कृष्ट नियोजन केले होते.
राहुल काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी सुभिक्षा यांनी संत निरंकारी मिशनची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली आहे. जगभरात या मिशनद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सदगुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या कृपा आशीवार्दाने संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, सामुदायिक विवाह सोहळा, सत्संग शिबीर आयोजित केले जात आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन आणि समाज कल्याण साध्य केले जात आहे. ही परंपरा पुणे शाखेने कायम ठेवली आहे.
दरम्यान, पुणे येथील एफएमसी ब्लड बॅकव ससून प्रादेशीक रक्तपेढी, ससून सर्वोपचार रूग्णालय यांनी रक्त संकलन केले. रक्त संकलन करण्यासाठी एएफएमसी ब्लडबॅकेचे मेजर डॉ. अनुराज व त्यांचे १६ सहकारी तसेच ससून प्रादेशीक रक्तपेढीचे वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक शरद देसले, डॉ. प्रगती, डॉ. श्वेता, डॉ. ओंकार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.