पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले सचिन तावरे यांच्यासह दोनशे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, तावरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असून, पाटील यांनी तावरे यांना अर्ज भरायला सांगितला आहे.
दरम्यान सचिन तावरे म्हणाले की, मी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. शिवाय माझ्याकडे इतरही पक्षांचे पर्याय खुले आहेत. आम्ही राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असताना कठीण काळात अजित पवार यांच्यापासून सर्व नेते शरद पवार यांना सोडून गेले होते. त्या वेळी त्यांना साथ दिली. मात्र, पक्षाने आम्हाला न्याय दिला नाही. शरद पवार यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी तुम्हाला केंद्रास्थानी ठेवून रणनीती ठरवू, असे सांगितले होते. पक्षाने पर्वतीतून तिकीट दिलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. येत्या मंगळवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, आमची ताकद दाखवून देऊ. माझी उमेदवारी कापल्यामुळे सामान्य कार्यकर्ता दुःखी झाला असल्याचेही तावरे यांनी सांगितले.