पुणे : विजयादशमीच्या शुभमुहर्तावर सारसबाग येथील महालक्ष्मी देवीला तब्बल १६ किलोची सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील रुप विलोभनीय आणि लक्ष वेधून घेणारे आहे. तर देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
दक्षिण भारतातील कारागिरांनी २० वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.
दरम्यान, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे देवीला सोन्याची साडी परिधान केली जाते. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी देखील सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील मनोहारी रुपाचे दर्शन भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने घेतले. आरोग्याच्या सुरक्षेसाठी भक्तांना मंदिरात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालिका, पोलीस प्रशासन याला कार्यकर्ते यांच्याकडून सहकार्य मिळत आहे.