उरुळी कांचन, (पुणे) : वडील खवळल्याच्या किरकोळ कारणावरून दहावीची परीक्षा दिलेल्या एका १६ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात मंगळवारी (ता. १६) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
श्रीराज उर्फ (टिंग्या) संतोष सोनावणे (वय- १६, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सतिष साहेबराव सोनावणे (वय – ५१, रा. दत्तवाडी उरूळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. श्रीराज याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नसून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराज हा कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन येथील शाळेत शिक्षण शिकत होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याचे आई-वडील व बहिण असे चौघेजण उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात राहतात. वडील शिवाजीनगर येथील एका खाजगी बँकेत नोकरीला आहेत. मंगळवारी घरातील सर्वजण आपापल्या कामात व्यस्थ होते.
यावेळी वडील संतोष सोनावणे हे गाडीच्या कारणावरून श्रीराज याला खवळले आणि बाहेर गेले होते. यावेळी श्रीराज हा घराच्या शेजारी असलेल्या पत्रा शेडडमधील अॅंगलला दोरीचे सहाय्याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईला दिसले. यावेळी श्रीराज याची आई सविता सोनावणे यांनी साडेसात वाजण्याच्या सुमारास सतीश सोनावणे यांना फोनवरून माहिती दिली होती.
माहिती मिळताच श्रीराजचे वडिल घरी आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्याला खाली घेऊन तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून श्रीराज याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.