माणसाच्या आयुष्यात पहिल्यांदाच ज्या पद्धतीने सुधारणा करण्याची संधी उपलब्ध होत असते. तो क्षण म्हणजे टर्निइंग पॉईंट ठरला जातो. त्यामुळे पुढे आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडून जीवन सुखकर बनले जाते. फक्त गरज असते ती निःपक्षपातीपणे सावरणाऱ्या हाताची होय. श्री अरविंद जगताप व श्रीमती वंदना अरविंद जगताप आज या दुनियेत नाहीत, पण, त्यांनी सावरलेल्या त्या मंतरलेल्या दिवसांची आठवण कधी ही न विसरणारी आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना मनातील भावना व्यक्त करणे आवश्यक आहे. नुकतेच श्रीमती वंदना जगताप यांचे मुबंईतील विक्रोळी पार्क साईड येथे ह्रदय विकाराने आकस्मित निधन झाल्याची बातमी समजली नि भूतकाळातील आठवणींनी उजाळा मिळाला आहे.
साधारण १९८७ साली वरळी बी डी डी चाळ क्रमांक ९६ खोली क्रमांक ५३ मध्ये जगताप कुटूंब म्हणजे दोघे पती-पत्नी व जीवन,सचिन, विशाल अशी लहानशी चिमुकली तीन भावंडे राहण्यास आली होती. या चाळीत प्रत्येक कुटूंब म्हणजे एक मोठे घर होते. एकमेकां बद्दल असलेली आपुलकी, जिव्हाळा तसेच घराला घरपण देणारी माणसं होती. प्रत्येकांच्या सुखदुःखात धावून जाणारी ती माणसं कधीच विसरू शकत नाही. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने जीवनात आनंदीदायी जगण्याची उमेद मिळाली. अशा या कुटूंबातील अरविंद जगताप यांचे मुळगाव वारुगड ता माण तर सासुरवाडी निढळ ता खटाव होती.वरळीच्या त्या अनेक चाळीत अगोदरचे नातेसंबंध असल्याने अनेक कुटूंब एकमेकांशी जोडली गेली होती.अरविंद जगताप हे ग्लॉक्सो कंपनीत वरळीला कामाला असल्याने पगार सुध्दा चांगला होता. लहानपणी केलेल्या कष्टाचे चीज करण्यासाठी जगताप यांचे मेव्हणे श्री कांबळे यांच्या सहकार्याने नोकरी मिळाली होती. त्यामुळे सुखाचे दिवस सुरू झाले होते.
वरळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून माझी व माझ्या मित्रांची एक कार्यकर्ता म्हणून चांगली ओळख निर्माण झाली होती. त्यातून भोवतालच्या परिस्थिती नुसार अनेक गोष्टी नकळत घडत गेल्या पण, आमच्या पिढीने शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही जिद्द कधी सोडली नाही.त्यातून जगण्याचे बळ मिळाले तसेच जगताप,इंजे कुटूंबातील लोकांकडून माणुसकीचे दर्शन झाले. त्याच माणुसकीने अक्षरशा माझा कोणतीही अडचण नसताना व कोणतीही अपेक्षा न ठेवता सांभाळ केला होता. आज ही ऋणानुबंध कायम राहिली आहेत.
१९९४ साली वरळीची खोली लहान पडू लागल्यानंतर जगताप कुटूंब विक्रोळी पार्क साईड येथे देवदर्शन हौसिंग सोसायटीमध्ये राहण्यास गेले. पण, आमचे वैचारिक नाते कधी संपुष्टात आले नाही. लहान चिमणी पाखरं मोठी होत गेली, मी नोकरीनिमित्त सातारला राहण्यास आलो. पण, माणुसकीची नाळ कायम राहिली. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचंय ठरवलं होतं. ते स्वप्न पूर्ण झाले.
सातारा न्यायालयात स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असणारी पत्नी सौ.कल्पना तसेच अंकिता, निनाद ही मुले लाभली. या वाटचालीत ज्यांनी मला आधार दिला. त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार यांच्या सोबतच जगताप कुटुंबातील सदस्य यांचाही खूप मोठा वाटा आहे.हे कधी ही विसरू शकत नाही. माझ्या सुखदुःखात सावली प्रमाणे मला साथ देणारे माझे कुटूंब, बंधू इतकीच काळजी त्यांनी सुध्दा घेतली होती.
आज अरविंद व वंदना जगताप नाहीत, हे मानण्यास मन तयार नाही, कारण, सध्या मी सुध्दा आजारी आहे. सर्वजण काळजी घेत आहेत. आता वाढत्या वयानुसार सर्वांनाच काहींना काही त्रास होऊ लागला आहे. अशा वेळी जीवन, सचिन, विशाल व त्याची पत्नी सौ उज्वला, सौ स्वप्ना यांच्या सोबतच त्यांची मामा, मामी, चुलत बंधू, वहिनी यांच्यावर ही मोठी जबाबदारी आली आहे. जीवनची सर्वानाच काळजी घ्यावी लागणार आहे.
कारण, गेली चाळीस वर्षे तो आईच्या मायेत विसावला होता. आता आई विना त्याचा सर्वजण सांभाळ करतीलच अशी अपेक्षा आहे. शेवटी हे दुःखाचे दिवस जातील पण, आठवणींचा ओलावा कधी ही सुकणार नाही, सर्वानाच आता एकमेकांच्या आधाराची गरज आहे. पोरका झालेल्या जगताप कुटूंबाला धीर व शक्ती देऊ हीच अपेक्षा व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, बऱ्याच गोष्टी दाटून आल्या आहेत. शेवटी नियती पुढे कोणाचे ही काही चालत नाही. हेच खरे आहे. याची जाणीव अस्वस्थ करीत आहे. त्यामुळे येथेच थांबतो,,
शब्दांकन – अजित जगताप (सातारा)