अजित जगताप
सातारा : बुधवारी सकाळी ची वेळ. रस्त्यावरील वाहतूक वाढली होती. प्रत्येकांना घाई झाली होती. अशा वेळी पोवई नाक्यावर एक अपंग बांधव हाताने सरपटत जिवाच्या आकांताने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. वाहुतकीतून मार्ग काढताना त्याला मोकळी जागा मिळत नव्हती. अखेर त्याच्या मदतीला वाहतूक पोलीस धावून आले. त्यांनी रस्ता ओलांडून जाण्यास मदत तर केलीच त्याच बरोबर त्याला नवीन कुबड्या विकत देऊन माणुसकीचे ही दर्शन घडविले.
छत्रपती शिवराय यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात अनेक व्यक्ती, संस्था व सामाजिक कार्यकर्ते मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजाविताना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी लागते. महागड्या गाड्या, नंबर साठी लाखभर रुपये भरणाऱ्यांना नियम तोडल्यानंतर दंडात्मक रक्कम भरण्याची दानत राहत नाही. तेवढ्यासाठी फोनाफोनी करावी लागते.
ही चित्र नेहमी दिसते. परंतु, एका अपंग बांधवांना स्वखर्चाने कुबड्या विकत घेऊन देणारे पोलीस मित्र सुध्दा असतात. हे आज सातारा शहरातील वाहतूक पोलिसांनी दाखवून दिले आहे. बागायतदार कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन गावचे अपंग बांधव सागर बाबर हे कामानिमित्त सातारा शहरात आले होते.दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघात झाला व त्यामध्ये त्याचा एक पाय गमावला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
तो कुबड्यांविना आजपावेतो एक पायावर चालत असून त्याची घरची परिस्थिती गरिबीची असलेने त्यास आजपर्यंत साधी कुबड्या घेता येत नसलेचे समजले. तो कुबड्या घेण्यासाठी लोकांकडे मदत मागत समजताच सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व जावळी तालुक्यातील आलेवाडी गावचे सुपुत्र पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी आर्थिक मदत म्हणून कुबड्या घेऊन दिल्या.त्यामुळे श्री बाबर यांना मोठा आदर मिळाला आहे.
आज ही सातारा शहरात माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला आहे. सदर पोलीस बांधवांना ही गरिबीची जान असल्याने खऱ्या अर्थाने त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे. त्याबद्दल त्यांचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शरद काटकर, अजित जगताप, शंकर कदम व अपंग बांधवसाठी झटणारे युवा नेते अमोल पवार यांनी मनापासून आभार मानले आहेत.