सुरेश घाडगे
परंडा : शेतीच्या कामासाठी ग्रामिण भागात मजूर मिळत नाहीत. तर मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आत्याधुनिक यांत्रीक शेतीकडे वळला आहे. शेतीच्या फवारणीच्या कामासाठी ग्रामिण भागात ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. तांबेवाडी येथील गणेश करळे यांनी हा ड्रोनने फवारणीचा व्यवसाय सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी अधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त उपयोग शेतीत केल्यास कमी वेळेत जास्त कामे होऊ शकतात. ड्रोनचा शेतात फवारणीसाठी होणारा वापर शेतकऱ्याचा वेळ, औषधे वाचवणारा आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .असे मत जिल्हा परिषद कृषी व पशूसंवर्धन माजी सभापती तथा प्रगतशील शेतकरी रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले .
करळे यांनी कृषी पदविका शिक्षण घेतले आहे. शेतात कामाला मजूर मिळत नाहीत. यातच मजूरीचे दर सर्व सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात राहिले नाहीत. ही गरज ओळखून त्याने हा व्यवसाय सुरु केला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ड्रोनच्या साह्याने तन-नाशक, किटकनाशक, खताची ओषधाची फवारणी केली जाते. शेतकऱ्याच्या वेळेची औषधाची बचत होते.
सुमारे सात लाख रुपयांचे ड्रोन मशीन करळे यांनी विकत घेतले आहे. फवारणसाठी सातशे रुपये प्रति एकर साठी घेतले जातात. तालुक्यातील एकमेव ड्रोन फवारणीचा बहुदा हा पहिला व्यवसाय असावा. दिवसभरात १५ एकर फवारणी होऊ शकते. औषधाच्या बचतीतून फवारणीचा खर्च निघू शकतो. वेळ वाचू शकतो.
तसेच या भागात मोठया प्रमाणात सिंचनक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायाला भविष्यात मोठी संधी उपलब्ध असणार आहे.तालुक्यातील चिचपूर (बु )येथील युवराजसिंह पाटील यांच्या शेतातीत तुरीच्या पिकावर ड्रोनच्या मदतीने औषधांची फवारणी करण्यात आली .