अजित जगताप
सातारा : वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वडूजमध्ये हजर झाल्यापासून त्यांच्या हलगर्जी कारभाराने व अरेरावी करण्यामुळे नगरपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास नगरपंचायत प्रशासनाकडून होत आहे.त्या विरोधात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार किरण जमदाडे यांना वडूज परिसरातील कार्यकर्त्यानी निवेदन दिले.
वडूज शहरात डेंग्यू, चिकन गुण्या, मलेरीया यासह साथीच्या आजारांनी थैमान मांडले असताना मुख्याधिकारी या नात्याने त्यांनी शहरातील कोणत्याही प्रभागात भेट दिली नाही की नागरिकांची चौकशी करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले नाही. आरोग्य विभागाशी आपत्कालीन बैठक घेऊन त्यासंदर्भात उपाय योजना अथवा जनजागृतीचे कामही झाल्याचे दिसून येत नाही.
देशभर लोकसहभागातून पर्यावरण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान अशा समाज जागृती करणाऱ्या जनजागृती अभियान राबविले जात आहेत. येथील नगरपंचायतीमध्ये गेल्या पंचवार्षिक काळात तत्कालीन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी यांनी असे उपक्रम राबवून नागरिकांत जनजागृतीचे काम केले होते.
मात्र सद्या येथे कर्तव्यावर असणारे मुख्याधिकारी अशा राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कामचुकारपणाची भावना दाखवित आहेत. त्यांच्या काळात अशी एकही जनजागृतीची मोहिम राबविली गेली नसल्याचे दिसून येते. अशा तक्रारी निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर डॉ संतोष गोडसे, परेश जाधव, विजय शिंदे, राजेंद्र जगताप,सुरज लोहार, गजानन निकम, राहुल सजगणे, योगेश जाधव, राजू माने यांच्या सह्या आहेत.
दरम्यान, वडूज नगरपंचायत कार्यालयात ही मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी नगरसेवक भाजपचे ओमकार चव्हाण, काका बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वायदंडे, शशिकांत पाटोळे उपस्थित होते.