अजित जगताप
सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक जाणीव ठेवून इंधन बचत महा हा विधायक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत असताना वडूज ता खटाव तालुक्यातील एस. टी. महामंडळाच्या आगारात दोन वर्ष चक्क सुमारे बारा हजार लिटर डिझेल इंधन वापराविना पडून आहे. त्या अर्थाने इंधनाची बचत झाल्याची भावना जनसामान्यांपर्यंत पोचली आहे. याबाबत आता एस.टी. महामंडळाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे
खटाव तालुक्यातील वडूज- दहिवडी रस्त्यावर एस .टी .आगार आहे . तात्कालीन सहकार तथा पालकमंत्री अभयसिहराजे भोसले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष पी .के. अण्णा पाटील व राज्यमंत्री शिवाजीराव शेंडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या एस टी आजाराचे उदघाटन करण्यात आले होते.
त्यानंतर अलिकडच्या दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यात आला. सदरच्या पेट्रोल पंपामध्ये सुमारे बारा हजार लिटर डिझेल त्या पंपाच्या टाकीमध्ये ओतण्यात आले. परंतु ,एक एस टीने ठोकल्याने सदरचा पंप नादुरुस्त झालेला आहे. त्याला आता दोन वर्षे झाली तरी त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कदाचित इंधन बचत हा उपक्रम राबवण्यात येत आहे का? असा प्रश्न निर्माण झालेले आहे. सदर डिझेल अजूनही टाकीत असून त्याचा वापर का झाला नाही? याची एस.टी. महामंडळाच्या कर्तबगार अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास बऱ्याच गोष्टी उघडकीस होतील.
कागदोपत्री इंधन बचतीचा संदेश दिला जातो तर दुसरीकडे इंधनाचा वापर होत नसल्याने सदर इंधनाचा खर्च हा एस .टी. महामंडळाच्या खात्याला करावा लागला आहे. तरी सुध्दा वापराविना इंधन पडून आहे. ही बाब गंभीर असून याबाबत योग्य तो कार्यवाही व्हावी अशी खटाव तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यानी तोंडी मागणी केली आहे.
सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने इंधन बचत महा साजरा करून इंधन बचतीचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचे सर्वत्र स्वागत होत असतानाच इंधनाचा वापर न होता. हे इंधन दोन वर्षे झाली पडून आहे. ही बाब अनेकांना चांगलीच खटकू लागली आहे. दरम्यान, याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता राज्यातील एस टी महामंडळाचे सर्व इंधन पंप पुढील महिन्यात सुरू होतील अशी अधिकृत माहिती देण्यात आली.