उरुळी कांचन, (पुणे) : सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सोयाबीन, गाजर, मका, फुले, मेथी, कोथंबीर व तरकारी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी पिकांबरोबर बांध व जमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कृषी खात्याने पंचनामे सुरु केले असून दिवाळीपर्यत तर मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. झालेला पाऊस हा शेती पिकांना नुकसान करणारा ठरत आहे.
शेतातील खुरपणी किंवा तरकारी लागवडीची कामे रखडली आहेत. सद्यस्थितीत अजून पाऊस चालूच राहिल्यास शेती पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीतीही शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. हवामान खात्याने शनिवार (ता. १७) पर्यंत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पाऊस व जोराच्या वाऱ्याने काही ठिकाणी असलेले मक्याचे पीक भुईसपाट झाले. हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. उभ्या पिकांचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे सुरुहि करण्यात आले आहेत. मात्र मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तशी मागणी देखील परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
दरम्यान, या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली असून मका, बाजरी, कांदा रोपे, भुईमुग पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाकडून पंचनामे सुरु असून पावसामुळे कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत वळती येथील शेतकरी किरण कुंजीर म्हणाले, “मागील आठ दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतामध्ये असणारे बाजरी, भुईमुग, पालेभाज्या, कांदा रोप इ. पिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. पंचनामे झाले असून सरकारकडून दिवाळीपर्यंत तरी मदत मिळावी हि अपेक्षा आहे.