पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुण्यात आज (ता. १३) विविध राजकीय पक्ष, संघटनांनी बंद पुकारला आहे. या बदला हडपसर व मांजरी परिसरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हडपसर, मांजरी परिसरातील अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा बंदला आज पाठिंबा मिळाल्याचे पहायला मिळाले. मांजरी बुद्रुक येथील आण्णासाहेब मगर उपबाजारात तसेच हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट मध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी येथील पीएमपीएलचे आगारही बंद करण्यात आले होते. याशिवाय गाडीतळ येथील पीएमपीएमएलच्या बस स्थानकात बसेस नसल्याने अगदी तुरळक गर्दी आहे.
तसेच, पुणे- सोलापूर महामार्गालगत असलेली सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दुपारनंतर काही मार्गावरील बसेस सुरू करून प्रवासाची सोय करण्यात आली आहे. हडपसर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान आमदार चेतन तुपे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने हडपसर गाव, वेशीसमोर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी वानवडी ते हडपसर गाव मोर्चा काढून निषेध नोंदवला व बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंद मध्ये सहभागी झाले.