पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात भरधाव दुचाकी घसरुन सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कोढव्यातील टिळेकरनगर परिसरात घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार पती जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुनितादेवी विजयकुमार सिंग (वय-४८, रा. व्यंकटेश गॅलक्सी अपार्टमेंट, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात विजयकुमार शिवमंगल सिंग (वय ५४) जखमी झाले.
याबाबत पोलीस हवालदार बिपीन सूर्यवंशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार विजयकुमार यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विजयकुमार आणि त्यांची पत्नी पुनितादेवी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टिळेकरनगर परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार विजयकुमार आणि पुनितादेवी खाली पडले.
पुनितादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पुनितादेवी यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.