पुणे : महाराष्ट्र शासनाचा “विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार” विजेत्या ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर (वय-९०, रा. पुणे)) यांचे काल बुधवारी (ता.१४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तमाशा व लावणी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
गुलाबबाई संगमनेरकर यांचा जन्म १९३३ साली संगमनेर (जि. अहमदनगर) येथे झाला होता. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच या लोककला क्षेत्रात आल्या. त्यांनी सुगंधाबाई सिन्नरकर, वनुबाई शिर्डीकर, गोदावरीबाई पुणेकर यांच्या बारीत पारंपरिक खड्या नृत्याची आणि बैठकीची लावणीचे धडे गिरवले. गोड आवाजामुळे त्यांनी पुढे बैठकीच्या लावणीत नाव कमावले. तमाशा क्षेत्रात नावामागे आदराने गावाचे नाव लावले जाते. त्यामुळे त्यांनी थोरात आडनावाऐवजी संगमनेरकर हे आपल्या गावाचे नाव जोडले आणि ते आपल्या कलागुणांनी रोशन केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर दिल्लीमध्ये सादर झालेला लावण्यांचा कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ‘आजोळची गाणी’ या अल्बममध्ये ‘राजसा जवळी जरा बसा..’ या लतादीदींच्या स्वरातील लावणीला गुलाबबाई यांच्या अदाकारीची साथ होती. त्यांना महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यासह अनेक पुरस्कार लोककला क्षेत्रातील सेवेसाठी मिळालेले आहेत.
दरम्यान, गुलाबबाई संगमनेरकर यांचे बुधवारी (ता.१५) पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कल्पना,अलका व वर्षा या तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक तमाशा व लावणी क्षेत्रातील कलावंत व नागरिक उपस्थित होते.