नवी दिल्ली : जर तुम्ही दहावी पास किंवा पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. कारण आयकर विभाग अर्थात ‘इन्कम टॅक्स डिपार्टमेंट’मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आवश्यक पात्रता असलेले इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवारांनाही यामध्ये संधी मिळू शकते.
आयकर विभागात कर निरीक्षक, कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदांवर भरती केली जात आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर असणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार incometaxgujrat.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.
एकूण पदे किती?
– या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ५९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 2 रिक्त पदे आयकर निरीक्षक पदासाठी, 26 रिक्त पदे कर सहाय्यक पदासाठी आणि 31 रिक्त पदे मल्टी टास्किंग स्टाफच्या पदासाठी आहेत.
भरतीसाठी वयोमर्यादा काय?
– आयकर निरीक्षक पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दरम्यान असावी. तर कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
काय असावी पात्रता?
– आयकर निरीक्षक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. कर सहाय्यक पदासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफच्या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
किती मिळू शकतो पगार?
– निवड झाल्यावर आयकर निरीक्षक – लेव्हल 7 (रु. 44,900/- ते रु. 1,42,400/-)
– कर सहाय्यक – लेव्हल 4 (रु. 25,500/- ते रु. 81,100/-)
– मल्टी-टास्किंग स्टाफ – लेव्हल 1 (रु. 18,000/- ते रु. 56,900/-)