पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कायम कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. बँकेतील कायम कर्मचाऱ्यांना सरसकट १० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ही पगारवाढ १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे.
बँकेचा १०५ वा वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा वरील निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने घेतला आहे.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा दर तीन वर्षांनी बँक आणि कर्मचाऱ्यांमध्ये करार होत असतो. यानुसार यापूर्वी २०१९ मध्ये करार झाला होता. यंदा जाहीर केलेली पगारवाढ ही येत्या ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर जानेवारी २०२४ पासून नवीन पगारवाढ मिळणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या पगारवाढीमुळे बँकेतील कायम असलेले १२०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयानुसार दरमहा किमान ३ हजार २० रुपये ते कमाल १५ हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. तसेच पगारवाढीचा मागील १९ महिन्यांचा फरक मिळणार आहे.
बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले कि, बँकेची वाटचाल पुढील १५-२० वर्षांत कशी असेल, याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात बँकेचे नवीन अद्ययावत ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबतही दुर्गाडे यांनी यावेळी घोषणा केली.