Police Recruitment : मुंबई, : मुंबई पोलीस दलात ११ महिन्यांसाठी कंत्राटी पोलीस भरती केली जाणार असून याबाबत गृह विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ३ हजार कंत्राटी पदे भरली जाणार आहेत.
३ हजार कंत्राटी पदे
मुंबई पोलीस दलात तातडीने मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाल्याचे पोलीस आयुक्तांनी शासनाला कळवले होते. त्यानुसार गृह विभागाने ही पोलीस शिपाई पदावरील कंत्राटी भरती करण्यासाठी मान्यता २७ जुलैला शासनाने दिली आहे.
बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याचा कालावधी अथवा ११ महिने यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीसाठी ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. कंत्राटी भरती करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला शासनाकडून २९ कोटी ५८ लाख ९६ हजार ४० रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे.
दरम्यान, आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात बंदोबस्तासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्यामुळे ही भरती केली जाणार आहे. ११ महिन्यांचे हे कंत्राट असून त्यानंतर हे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रुजू होतील. यासाठी एकूण १०० कोटी २१ लाख ४५ हजार ५८० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.