महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५,६३१ पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी देणारा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. ही बातमी पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची आहे.

गृह विभागाने सादर केलेल्या ‘जीआर’नुसार महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

एकूण पदं – १५,६३१ पदं
पोलिस शिपाई – १२,३९९ पदं
पोलिस शिपाई चालक – २३४ पदं
बॅण्डस्मन – २५ पदं
सशस्त्र पोलिस शिपाई – २३९३ पदं
कारागृह शिपाई – ५८० पदं
भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती :-
पदसंख्या : एकूण १५,६३१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बॅण्डसमन, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई यांचा समावेश आहे.
प्रक्रिया : भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. यामध्ये अर्ज भरणे, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि अंतिम निवड यादी यांचा समावेश असेल.
शारीरिक चाचणी : उमेदवारांना शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी १:१० या प्रमाणात उमेदवार निवडले जातील. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत.
वेळापत्रक
यापूर्वी जाहीर झालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ पूर्वी अर्ज भरणे, छाननी आणि परीक्षा घेणे शक्य नसल्याचे विद्यार्थी समन्वय समितीने म्हटले होते. मात्र, आता शासन निर्णय जारी झाल्याने लवकरच प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
परीक्षा शुल्क किती?
पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये आकारले जाणार आहेत.







