हिंगोली: हिंगोली शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका बापाने पोटच्या मुलीची हत्या करून नंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. ही घटना शहरातील मस्तान शहा नगर भागात उघडकीस आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने नात्यातील एका मुलाशी लग्न करण्यास नकार दिला होता. या गोष्टीमुळे वडील खूप नाराज होते आणि याच कारणावरून बाप-लेकीमध्ये वाद झाला होता. याच रागातून वडिलांनी मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला.

घटनेच्या दिवशी, मुलगी झोपलेली असताना वडिलांनी तिचा गळा दाबून खून केला. मुलीचा खून केल्यानंतर त्यांना मोठा पश्चाताप झाला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताची नस कापली आणि घरात गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या सखोल तपासानंतर या घटनेमागील सत्य समोर आले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







