पुणे : राज्यात १५ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन केले आहे.
तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, तसेच राज्याची उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे
जिल्हापातळीवरही तीन विजेत्यांची निवड केली जाईल. विभागस्तरावर सहा सर्वोत्कृष्ट नवउद्योजक आणि सहा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना दहा हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
शाश्वत विकास, कृषी, शिक्षण, आरोग्य, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअपना पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल.
यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण, त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून, तर नागपूरहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील. अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथूनही यात्रेचा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ होणार आहे.