नागपूर: शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये लवकरच तब्बल २ हजार २२८ नवीन पदांची भरती (Govt Jobs) केली जाणार आहे. राज्य सरकारने या पदनिर्मितीला मंजुरी दिली असून, यामुळे अनेक तरुणांच्या हाताला सरकारी नोकरी मिळणार आहे.

मंत्रिमंडळाची मंजुरी, मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठासाठी पदे:
न्यायालयीन कामकाज अधिक गतीमान करण्यासाठी तसेच माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मूळ शाखा, अपील शाखा, तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता गट-अ ते गट-ड संवर्गात २,२२८ अतिरिक्त पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या पदनिर्मितीसोबतच या पदांसाठी लागणाऱ्या वेतन अनुदान आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीस देखील मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुठल्या पदांचा समावेश असणार?
न्यायालयात कोणत्या पदांवर किती भरती होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, न्यायालयांमध्ये साधारणतः सहाय्यक, टंकलेखक (लिपिक), कॉपीस्ट, परीक्षक अशा विविध पदांवर भरती केली जाते. टंकलेखक पदासाठी टायपिंग येणे आवश्यक असते.
पदवीधर तसेच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही अत्यंत चांगली संधी असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच अभ्यासाला लागणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण लवकरच या भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.







