पुणे: भारतीय संस्कृतीत अमावस्येला ‘पितृ तिथी’ आणि आध्यात्मिक साधनेचा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. विशेषतः दर्श अमावस्येचे महत्त्व अधिक आहे, कारण ही तिथी आत्मचिंतन आणि पूर्वजांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. मात्र, अनेकांना या दिवशी नेमके काय करावे आणि काय टाळावे, याबद्दल अधिक माहिती नसते. या तिथीला काही गोष्टी टाळणे हे केवळ अंधश्रद्धा नसून, त्यामागे मानसिक आणि आध्यात्मिक महत्व आहे.
काय टाळावे आणि का?
अमावस्येला चंद्रदर्शन होत नसल्याने मानवी मनावर आणि शरीरातील जलतत्त्वावर त्याचा थेट परिणाम होतो. या दिवशी मद्यपान किंवा मांसाहार केल्याने मनाची चंचलता वाढते आणि रागावरचे नियंत्रण सुटते. याचा थेट परिणाम तुमच्या निर्णयक्षमतेवर आणि पर्यायाने घराच्या प्रगतीवर होतो.

अमावस्येला ‘रिक्त तिथी’ असेही म्हटले जाते. ही वेळ नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी पूरक मानली जात नाही. ही तिथी केवळ पितरांना तर्पण देण्यासाठी आणि आध्यात्मिक भक्तीसाठी फायदेशीर आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, अमावस्येच्या रात्री अंधार सर्वाधिक असतो. जुन्या जाणत्या लोकांच्या मते, या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशान किंवा निर्जन स्थळी जाणे मानसिक शांततेसाठी धोक्याचे ठरू शकते.
अमावस्या ही तिथी गोंगाट आणि वादापासून दूर राहून स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही संधी असते. या दिवशी कोणाचाही अपमान केल्यास किंवा वाद घातल्यास त्याचे मानसिक परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात. या दिवशी नवीन खरेदी करण्यापेक्षा दानधर्म करण्यावर भर द्या. घरातील स्वच्छता करून धूप किंवा कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. संयम आणि शांती हाच या तिथीचा खरा मंत्र आहे.







