आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण काही आजार हे नकळतपणे बळावतातच. त्यात ब्रेन स्ट्रोक ही देखील एक गंभीर समस्या बनत आहे. मात्र, आता बरेच स्ट्रोक टाळता येण्यासारखे आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ज्यानुसार, जीवनशैलीतील बदल आणि काही उपायांद्वारे स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकतो.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि लठ्ठपणा यांसारख्या स्ट्रोकच्या जोखीम घटकांची चाचणी करण्यावर भर देण्यात आला आहे. डॉक्टरांकडून या आरोग्य समस्या लवकर आणि नियमित तपासण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्या गंभीर होण्याआधी त्यावर नियंत्रण ठेवता येईल. विशेषत: उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असलेले लोक डॉक्टरांशी योग्य योजना करून हा धोका कमी करू शकतात. विशिष्ट आहाराचा समावेश करा. ज्यामध्ये ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि ऑलिव्ह ऑईल यांचा समावेश करावा. हा आहार हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारतो आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो.
तसेच रेड मीट, साखरयुक्त अन्न आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स यांचे सेवन कमी करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय, तुमची शारीरिक हालचाली वाढल्या पाहिजेत. इनअॅक्टिव्हिटी अर्थात निष्क्रियता हे स्ट्रोकचे प्रमुख कारण बनू शकतं. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम किंवा 75 मिनिटे उच्च-तीव्रतेचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. सर्वात सोपा व्यायाम करायचा असल्यास पायऱ्या चढणे किंवा दररोज चालणे हेदेखील स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.