Health News : शिरूर ( पुणे ) : दिवाळी आली की थंडी देखील हळूहळू वाढते. त्यातून सध्या आक्टोबर हीट देखील जाणवत आहे. पहाटेच्या वेळी वाढलेल्या थंडीमुळे आबालवृद्धांची भूक वाढली आहे. मात्र, ही भूक शमवणारा नाश्ता आरोग्यदायी असणे गरजेचा आहे.
थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या नाश्त्याकडे गृहिणींनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या वातावरणात बदल झालेला जाणवत आहे. पहाटे थंडी तर दिवसा उन्हाचा चटका तर रात्री पुन्हा थंडी पडत आहे. एक ऋतू बदलून दुसरा सुरू होत असताना शरीरात व वातावरणात अनेक बदल घडत असतात. या दरम्यान आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या काळात आरोग्यदायी नाश्तावर सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आहारतज्ञ करत आहेत. थंडीच्या काळातील सकाळच्या नाश्तासाठीच्या काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे.
भिजविलेले पदार्थ आहारात असावे…
लहान मुलांना शाळेमध्ये जाण्याची घाई असते. त्यांना भूक देखील खूप जास्त लागते. त्यांच्यासाठी दररोज सायंकाळी पाणी किंवा दुधात भिजवलेले पदार्थ पाहिजे. त्यामध्ये सुकामेव्याचा अधिक प्रमाणात समावेश करता येऊ शकतो. हे दुधात भिजवून देता येतात. सर्व वयोगटातील भिजवलेला सुकामेवा उपयुक्त ठरतो.
दुध व पालेभाज्यांचा नाश्ता…
सकाळी नाश्ता करताना शक्यतो पालेभाज्या मिसळलेले पदार्थ असावेत. उपमा करताना त्यात देखील भाज्या मिसळाव्यात. पराठ्यासारखे पदार्थ भाज्यांचा वापर करून केले जावेत. कारण मुलांना आहारातून पुरेशे फायबर मिळू शकते. घरी बनविलेल्या दह्यासोबत कडधान्य म्हणजे उसळीचे फ्रकार वाफवून देता येतील. मात्र दही हे घरीच बनविलेले असावे.
जेष्ठांसाठी नाश्ता
जेष्ठांसाठी नाश्त्यामध्ये रात्री भिजविलेले अंजीर, खजूरघ्यावेत. ताजे गरम दूध द्यावे. मधुमेह नसेल तर जवाची खीर, पातळ उपमा आरोग्यास चांगला असतो. गहू, ज्वारी व डाळीचे मिश्रण वापरून केलेले पराठे किंवा थालपिठ चांगले उपयुक्त ठरू शकते . घरातील जेष्ठांना सकाळी भूक लागल्यावर वेगळे पदार्थ बनवायला हवेत जे पदार्थ पचनासाठी हलके असावेत.
लहान मुलांचा नास्ता…
सकाळी रात्री भिजवून ठेवलेले पदार्थ द्यावेत. मुलांना भरपूर दूध नाश्तासोबत द्यायला हवे. नंतर उसळी, पालेभाज्या मिक्स केलेले उपमास आमलेट, पराठे व सांबर दिले पाहिजे.
पहाटेच्या वेळी आता गुलाबी थंडी पडू लागली आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, रोग प्रतिकार क्षमता कमी होते, अॅलर्जी, केसगळती असे प्रकार घडू लागतात. स्नायूंचा कडकपना, शरीरात वेदना होण्याचे प्रकार वाढतात. कुटुंबातील विविध वयोगटातील मुले व जेष्ठ असतात. त्यांना त्यांच्या आवडीनुसार पदार्थ नाश्तासाठी करावे. त्यातून थंडीमुळे लागलेली सकाळची भूक भागते.
डॅा. दौलत उंडे, अनंतराव कणसे होमोपॅथीक कॅालेज, आळेफाटा