उरुळी कांचन, (पुणे) : चोरीच्या सापडलेल्या, बेवारस आढळलेल्या, अपघातातील जप्त केलेल्या अशा शेकडो दुचाकी व अन्य वाहनांनी उरळी कांचन पोलीस ठाण्याचा परिसर ‘फुल्ल’ झाला आहे. दुचाकींची संख्याची शेकडोच्या घरात गेल्याने या आवाराला भंगार बाजाराचे स्वरूप आले आहे. पोलीस वारंवार मालकांना ओळख पटवून गाडी घेऊन जाण्याचे आवाहन करत असले तरी वर्षानुवर्ष गाड्या तशाच पडून असून, त्यांची संख्या वाढतच चालली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन हद्दीतील तसेच पुणे सासवड मार्गावरील अपघाताचे प्रमाण जास्त आहे. तसेच पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, सोरतापवाडी उरुळी कांचन या ठिकाणाहून अनेकवेळा दुचाकी गाड्या चोरीला गेल्याचे आकडेवारी सांगत आहेत.
दुचाकी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी काही गाड्या शोधून आणल्या खऱ्या पण मूळ मालकच न सापडल्याने अशा शेकडो गाड्या उरूळी कांचन पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडलेल्या दिसून येत आहेत. अपघातातील बेवारस वाहने तसेच चोरीला गेलेली वाहने चोरट्यांकडून जप्त केलेली तसेच विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली लाखो रुपयांची वाहने आवारात उभी असून, यातील अनेक वाहनांना अक्षरशः गंज चढलेला आहे. यामध्ये दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत.
मूळ मालक वाहन परत नेण्यासाठी उदासीन..
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या परिसरात 500 पेक्षा अधिक दुचाकी वाहने आढळून येत आहेत. यासंदर्भात लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी घेऊन जाण्यासाठी वेळोवेळी माहिती दिली. तसेच सोशल मीडियासह संकेतस्थळावर आवाहन केले. परंतु, मूळ मालक गाड्या का घेऊन जात नाहीत असा प्रश्न येथील पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे.
न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी दुर्लक्ष..
पोलिसांकडून गाड्या घेऊन जाण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. शिवाय, काही गाड्यांची कागदपत्रे अपुरी असल्याने काही गाडीमालक गाड्या घेऊन जात नाहीत. पोलीस वारंवार गाडी मालकांचा शोध घेताना दिसत आहेत. परंतु, मोठ्या प्रमाणावर दुचाकीची संख्या असल्याने या गाड्यांच्या मालकांच्या शोधासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.
डोळ्यात तेल घालून पोलिसांना द्यावं लागतं लक्ष..
एख्याद्या पोलिस ठाण्याचा अपवाद वगळता सर्वच पोलिस ठाण्याला अपुरी जागा आहे. त्यात जप्त केलेल्या वाहनांचे सुटे भाग चोरीला जाण्याची भीती असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून लक्ष घालावे लागत आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल हा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करावा लागत असल्याने पोलिसांना वाहने सांभाळावीच लागतात.
दरम्यान, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे असतील तर पुरावा म्हणून जप्त वाहनांची मोठी मदत होती. अशी वाहने वाहनमालकाला कोर्टातून सोडवून घ्यावी लागतात.