सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला जमत नाही. परिणामी, अनेक आजार उद्भवू शकतात. त्यात मधुमेह, रक्तदाबाची समस्या तर फक्त प्रौढांमध्ये नाहीतर तरुणांमध्येही दिसून येत आहे. पण, त्यापासून वाचण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
ज्या लोकांना टाईप-1 मधुमेह आहे त्यांच्यासाठी यापूर्वी काही उपचार पद्धतीत विकसित करण्यात आल्या आहेत. त्यात मधुमेहाच्या रूग्णांना बरे करण्यासाठी मृत दात्याच्या स्वादुपिंडातून आयलेट पेशी काढल्या गेल्या आणि टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रत्यारोपण केले. स्वादुपिंडातील ‘आयलेट’ पेशी ‘इन्सुलिन’ आणि ‘ग्लुकागन’ सारखे हार्मोन्स तयार करतात, जे रक्तातील ‘ग्लुकोज’ची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मात्र, यात डोनर अर्थात दात्याची कमतरता असल्यामुळे ते करणे कठीण होत होते.
पण आता, ‘स्टेम सेल थेरपी’ने मधुमेहावरील उपचारांसाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. या उपचार प्रक्रियेमध्ये रासायनिक प्रेरित प्लुरिपोटेंट स्टेम-सेल-व्युत्पन्न आयलेट्स किंवा सीआयपीएससी आयलेट्स वापरतात. या प्रक्रियेत रुग्णाकडून पेशी घेतल्या जातात आणि त्यात काही रासायनिक बदल केले जातात. त्यानंतर ते पुन्हा रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाते. याने प्रभावी फरक पडत असल्याचाही दावा केला जात आहे.