पुणे, ता.१२ : कर्करोग अर्थात कॅन्सर. हा एक दुर्धर आजार आहे. या आजाराकडे जर विशेष लक्ष दिले तर त्यापासून वाचता येऊ शकते. पण थोडंजरी दुर्लक्ष केलं तर ते जीवावर बेतू शकतं. त्यामुळे काही अशा गोष्टी आहेत ज्यापासून दूर राहिल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत…
काय खावं?
सर्वच आजारांवर गुणकारी असतात ती फळे. ही फळे कोणताही आजार असो ती खाण्याचा सल्ला दिला जातोच. फळांचं नियमित सेवन करून कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. फळांमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. व्हिटॅमिन सी आणि मौसमी फळे खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो.
ग्रीन टी फायद्याचाच…
ग्रीन टी पिणारे आपण अनेकजण पाहिले असतील. हा ग्रीन टी आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या चहात अँटीऑक्सिडंट असते. जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. याशिवाय, टोमॅटोही गुणकारी असल्याचे सांगण्यात येते. कारण यामध्ये लायकोपीन आढळते. तसेच अॅंटीऑक्सिडंट गुणधर्मही आढळतात. यामुळे कर्करोगापासून लढण्यासाठी मदत मिळते.
काय करणं टाळावं?
व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला अनेकजण देतात. कर्करोगाच्या बाबतही तसंच आहे. जास्त दारू पिणे आरोग्यासाठी हानीकारक असते. कर्करोग असलेल्या रूग्णांनी दारू पिणे टाळले पाहिजे. सिगारेटही घातक मानली जाते. त्याने कर्करोगाला एकप्रकारे आमंत्रणच मिळते. त्यामुळे ते ओढणे तात्काळ थांबवले पाहिजे.
तळलेले पदार्थ टाळाच
तळलेले पदार्थ सगळ्यांनाच अतिशय आवडत असतात. पण जास्त तेलकट पदार्थ खाणे हानिकारक मानले जाते. कर्करोगाच्या रूग्णांनी तळलेल्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, असे केल्यास आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो.