पुणे, ता.०१ : निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभावं यासाठी सर्वचजण प्रयत्न करत असतात. पण काहींना आजारापासून दूर जाणं सहज सोपं होत नाही. त्यात काहींना डोकेदुखीची समस्या चांगलीच सतावत असते. अनेक जण सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त असतात. डोकेदुखीची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. काहींना सतत कामाचा ताण घेतल्यामुळे तर काहींना उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी जाणवते. पण यावर घरगुती उपचार केल्यास यापासून आराम मिळू शकतो.
डोकेदुखी जाणवत असल्यास नेमकं करावं तरी काय?
ऑक्सिजनची कमतरता हे डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे जर तुमचं डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होऊ शकते. याशिवाय, अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरू शकते. त्याने आराम मिळण्याची शक्यता आहे.
लिंबू पाणी फायदेशीर
शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी-जास्त झाल्यावर डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे डोकं दुखायला लागल्यावर लिंबू पाणी प्यावं. यात थोडंसं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालावा, असे केल्याने फायदा होऊ शकतो. तसेच डोकेदुखीवर लवंग हा उत्तम पर्याय मानला जातो. तव्यावर काही लवंगा शेकून घ्याव्यात. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.
पाणीदार फळे खा
डोकं दुखायला लागल्यावर पाणीदार फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. यात कलिंगड, द्राक्षे, खरबूज अशा फळांचा समावेश असावा. कलिंगड हे आरोग्यदायी समजले जाते. कारण, कलिंगडात नैसर्गिकरित्या पाण्याचा मुबलक प्रमाण असतं. त्यामुळे जर शरीर डिहायड्रेड झालं असेल तर कलिंगडामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत मिळते.