लहू चव्हाण
पाचगणी : जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आरोग्य विभाग व पाचगणी नगरपालिका विभागामार्फत आयुष्यमान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले असून लवकरात लवकर लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचगणी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम यांनी केले.
पाचगणी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम, डॉ. नयन बरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी शहरात वाॅर्ड निहाय आयुष्यमान भारतचे ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
यातील तयार झालेल्या कार्डचे वाटप पाचगणी आरोग्य केंद्रात करण्यात आले. यावेळी पालिका अधिकारी दिलीप रनदिवे, माधवी जगदाळे, कालिदास शेडगे, माजी नगरसेवक प्रवीण बोधे, आरोग्य सेवक जी. बी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या योजनेच्या माध्यमातून १ हजार २०९ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार असल्याने नागरिकांनी मोफत ई- कार्ड काढावे असे आवाहन यावेळी पालिका व आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले.
आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थ्यांना पाच लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते.या योजनेतंर्गत ई- कार्ड काढण्यासाठी लाभार्थींनी त्यांच्याकडे असलेल्या आयुष्यमान भारतचे पत्र, राशन कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन नागरिकांनी सोमवार ते बुधवार सकाळी ११ ते ४ या वेळेत पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे.
पाचगणी शहरात या कार्डसाठी पात्र असणाऱ्या २५०० लाभार्थ्यांपैकी सुमारे ५०० कार्ड काढले असून उरलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.