Sanitary Pads : मुंबई : आजकाल मासिक पाळी दरम्यान महिला सॅनिटरी पॅड आवर्जून वापरतात आणि एका विशिष्ट वेळेनंतर ते पॅड बदलतात. पण पॅड्स घालण्याबाबत आणि ते बदलण्यात थोडी जरी चूक झाली तरी मोठी अॅलर्जी होते. यात पुरळ येणे, खाज सुटणे, सूज येणे, लालसरपणा जाणवणे इत्यादींच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी महिलांना हा त्रास नंतर आठवडाभर तरी सोसावा लागतो. त्यासाठी काय करावे आणि मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊयात.
कित्येक वेळेलातर महिलांच्या योनीच्या भागात पुरळ येतात आणि घर्षण झाल्यामुळे त्यात जीवाणू तयार होतात. सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो. जसेकी जेल, वूड सेल्युलोज व कापूस या घटकांशिवाय पॉलिओलेफिन्स पॅडमध्ये असतात. जे त्वचेला हानिकारक असू शकतात. त्यामुळे काहींना अॅलर्जी होते. पॅड्सची रक्त शोषण्याची क्षमता वाढवण्यासाठी रसायनांचा वापर करून ब्लिच केले जात. या ब्लिचमध्ये डायऑक्सिन असते. जेव्हा पॅड रक्ताच्या संपर्कात येतात तेव्हा हे ब्लिच डायऑक्सिन व मिथेन वायू सोडतात. त्यामुळे महिलांना पुरळ आणि संक्रमण होते.
कशी काळजी घ्यावी?
कॉटनचे अंतर्वस्त्र घाला : नियमितपणे कॉटनचे अंतर्वस्त्र घालावे. ते घाम शोषून घेते. ज्यामुळे पुरळ होत नाही. दुसरे म्हणजे सैल कपडे परिधान करा.
योग्य पॅड निवडा : सॅनिटरी पॅड्सचे नवे ब्रॅण्ड बाजारात आले आहेत. स्वस्त पॅड्सच्या आमिषाला बळी पडू नका. लोकांनी कॉटन किंवा ऑरगॅनिक पॅडचा वापर करावा. कारण- त्यात हानिकारक रसायने किंवा रंग नसतात.
मेन्स्ट्रुअल कप : जर तुमची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल, तर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरा. कारण मेन्स्ट्रुअल कपमुळे तुम्हाला पुरळ येणार नाही. त्याशिवाय सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पून्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कपमध्ये जास्त रक्त शोषून घेण्याची क्षमता असते. मेन्स्ट्रुअल कप विघटन आणि विल्हेवाट करण्यास सोपा आहे. आणि वापरण्याससुद्धा सुरक्षित आहेत.
क्रिम्स वापरा: पुरळ दूर होण्यासाठी क्रिम्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला अॅलर्जी किंवा पुरळ आले असेल, तर क्रिम्स वापरा. कॅलामाइनसारखे लोशन तुम्ही वापरू शकता.
स्वच्छता ठेवा : योनीचा आजूबाजूचा भाग नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. योनीची योग्य पीएच पातळी साधारणपणे ३ ते ४.५ च्या दरम्यान असावी. ही पातळी कोणत्याही प्रकारच्या जीवाणूंची वाढ थांबवते.