लोणावळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने लोणावळा, खंडाळ्यात नाताळ व थर्टीफस्टचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी मास्कचा वापर करण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार काही देशांमध्ये झपाट्याने वाढू लागला आहे. भारतातदेखील काही प्रमाणात नव्या करोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. लोणावळ्यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. नाताळ व वर्षअखेर हे दोन्ही महत्त्वाचे दिवस शनिवार आणि रविवारी आल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून पर्यटकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. त्याचप्रमाणे स्थानिक व्यावसायकांनीही मास्कचा वापर करावा, पर्यटकांना मास्क व सॅनिटायझर वापरण्यासंदर्भात सूचित करावे,’ असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
पोलिसांनी हॉटेल, बंगले, कृषी पर्यटन केंद्रावरील टेन्ट व्यवसायिकांच्या मीटिंग घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत; तसेच ‘अवैध अथवा चुकीच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घ्या. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळा शहरा व ग्रामीण परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहने तपासणीसाठी ‘चेकपोस्ट’ लावण्यात येणार आहेत.