लोणी काळभोर, ता.१३ : पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार वाढायला सुरुवात होते. त्यापासून वाचण्यासाठी प्रयत्नही केले जातात. त्यात डेंग्यूचा धोका मोठा असतो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. डेंग्यू विषाणूचे ४ प्रकार, आहेत. संक्रमित एडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो वाढत जातो. संक्रमणात्मक डासाने चावा घेतल्यानंतर ४ ते १० दिवसात मनुष्याला हा आजार होतो. त्यामुळे नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. छगन खारतोडे यांनी केले आहे.
डॉ. खारतोडे म्हणाले, लक्षणांनुसार या आजाराचे तीन प्रकार आहेत. डेंग्यू ताप, डेंग्यू हिमोरेजिक ताप (डीएचएफ) आणि डेंग्यू शॉक सिन्ड्रोम. डेंग्यू हिमोरेजिक ताप आणि डेंग्यू शॉक सिन्ड्रोम हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. या आजाराचे निदान झाल्यावर रुग्णांनी लवकर दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे व त्वरित उपचार घेऊन ठणठणीत बरे व्हावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
या डेंग्यूची लक्षणे नेमकी कोणती?
१) थंडी वाजून अधिक तीव्र ताप येणे. तीव्र डोके दुखणे, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लालसर चट्टे दिसुन येतात. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते. म्हणून डेंग्यू तापाला ‘ब्रेक बोन फिव्हर’ असेही म्हणतात. डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखतो. डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते. चव आणि भूक नष्ट होणे. त्वचेवर गोवरासारखे पुरळ येणे. मळमळणे आणि उलट्या होतात. पोट दुखते, भूक मंदावते.
२) डेंग्यू हिमोरेजिक ताप (डीएचएफ)
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून, यात तापाबरोबरच प्लेटलेट्सची संख्या कमी होऊन अनियंत्रित रक्तस्राव होतो- अंगावर लाल चट्टे उठतात. हिरड्यांमधून रक्तस्राव होतो, आतड्यांमधून रक्तस्राव होतो. त्याचबरोबर छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. रुग्णाला तहान लागते आणि तोंडाला कोरड पडते. नाडी कमकुवतपणे जलद चालते. श्वास घेताना त्रास होतो. सतत तीव्र पोटदुखी होते. कावीळ होते. त्वचा फिकट, थंड होते.
३) डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू हिमोरेजिक तापाचीच पुढची अवस्था असून, काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, अंग थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे, मूत्रपिंडाचे काम कमी होऊन लघवी कमी होते आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
योग्य उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा
लवकर निदान आणि योग्य उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. त्याचबरोबर आराम करावा. भरपूर पाणी प्यावे. साधारणतः दिवसात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. साधा आहार घ्यावा. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांना भेटून उपचार घ्यावेत. उपचारास उशिर झाल्यास साध्या डेंग्यू तापाचे रुग्ण गंभीर होऊ शकतात. डेंग्यू तापात शरीरातील प्लेटलेटसची संख्या कमी होत जाते. त्यासाठी सतत रक्ताची तपासणी करावी लागते. प्लेटलेटसची ‘खुप कमी असल्यास, रक्तस्राव होत असल्यास किंवा रक्तदाब कमी असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
नेमकं काय करावं?
या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. घराच्या आजूबाजूला पाणी साठू देवू नये. वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. कूलर, जुने टायर, कुंड्या, बादल्या, फुलदाण्या यामध्ये पाणी साचून राहते. तिथे पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
दरम्यान, फिशटँक, फुलदाणीतील पाणी वेळोवेळी बदलावे. डासनाशक साधनांचा वापर करावा. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. झोपताना मच्छरदाणी वापरावी. घरांच्या खिडक्यांना जाळ्या लावाव्या. दारं-खिडक्या शक्यतो बंद ठेवावीत.