पुणे : पुणे शहरात झिका विषाणूचा रुग्ण आढळला असून त्यावर पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. मूळचा नाशिक येथील हा रुग्ण पुण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात तो सुरतला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. झिकाचा रुग्ण सापडल्याने पुणे महापालिकेची महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सदर रुग्ण हा नाशिकचा आहे. तो ६ नोव्हेंबरला पुण्यात आला होता. त्यापूर्वी २२ ऑक्टोबरला तो सूरतला गेला होता. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. पण खबरदारी म्हणून महापालिकेने पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात १६ नोव्हेंबरला हा रुग्ण ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी जहांगीर रुग्णालयात आला होता. यानंतर खासगी प्रयोगशाळेत या रुग्णाचे नुमने पाठवण्यात आले.
दरम्यान, १८ नोव्हेंबरला तो झिका बाधित असल्याचे समोर झाले. यानंतर त्याचे नमुने हे पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवण्यात आले. एनआयव्हीच्या तपासणीत ३० नोव्हेंबरला रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले.