पुणे : समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तिला वैद्यकीय सेवा मोफत मिळावी. आर्थिक कारणांमुळे कोणताही रूग्ण वंचित राहता कामा नये, तसेच एका सुदृढ व निकोप समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने ‘मोफत आरोग्यसेवा अभियान’ राबविण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष आकाश धोत्रे व विशाल पवार यांच्या वतीने पुणे शहरातील नामांकित रूग्णालयाच्या सहयोगाने ही सेवा देण्यात आली. गोखलेनगर परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर रविवारी (ता. 12) या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन आनंद पंडित, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, डॉ. मुकुंद जोशी, डॉ. सत्यजीत नाईक, डॉ. अविनाश भोंडवे, बाबु वागकर, साईनाथ बाबर, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय शिबिरात 2 हजार 300 पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग घेतला, त्यापैकी काही नियोजित शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. ज्यामध्ये चार लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया, एक हृदय शस्त्रक्रिया (ज्येष्ठ नागरिक एन्जोप्लास्टी) व एक ब्रेस्ट कॅन्सर वरील सर्व उपचार. नऊ (जयपुर फूट) कृत्रिम अवयव वाटप दोन व व्हील चेअर. एकोणीस जनरल सर्जरी. सुमारे त्रेचाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 26 रुग्णांचे रूट कॅनाल, 350 हून अधिक नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच उर्वरित नोंदणीकृत नागरिकांचे बाकीच्या तपासण्या झाल्यावर पुढील उपचार आवश्यकतेनुसार केले जातील.
दरम्यान, परिसरातील नागरिक व आरोग्य शिबिरात सहभागी लाभार्थी यांनी आकाश धोत्रे व विशाल पवार यांच्या सामाजिक कार्याबाबत कृतज्ञ भाव व्यक्त केले. जनसामान्यांची गरज ओळखून त्यांच्यावर असलेला वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी होत रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे हसू उमटवत येथील नागरिकांनी या सामाजिक सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
आरोग्यपूर्ण व सक्षम समाज निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. चेतन पंडित यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला पुणे शहरातील मनसेचे सर्व पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आरोग्य अभियान एका दिवसापुरते मर्यादित नसून गरजू रुग्णांनी आमच्या शिवाजीनगर येथील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. असे आवाहन रणजित शिरोळे यांनी केले.