शुभम वाकचौरे
Junnar News : जांबूत : जुन्नर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नारायणगाव याठिकाणी देशी बनावटीच्या पिस्तूलचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई करून जेरबंद केले.
नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
पवन दत्तात्रय शेजवळ (वय ३७, रा. शिव विहार सोसायटी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेले व्यक्तीचे नाव आहे. नारायणगाव-जुन्नर रस्त्यावर हॉटेल गॅलेक्सी याठिकाणी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल दाखवून धाक निर्माण करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेद्वारे पोलिसांना मिळाली. (Junnar News) नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल हासे त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पुणे पोलीस ग्रामीणचे दीपक साबळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वारे, अक्षय नवले या सर्वांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, पवन शेजवळ हा गावठी पिस्तूल दाखवून त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
नारायणगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असता कुणीही शांततेचा भंग करू नये, अथवा कायदा हातात घेऊ नये. कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. (Junnar News) पुढील तपास पोलीस हवालदार रमेश काटे करत आहेत.