पुणे, ता.२३: आपले डोळे हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. डोळे हे संपूर्ण शरीराचा एकप्रकारचा दिवाच असतात. पण हीच दृष्टी वाढत्या वयानुसार किंवा इतर काही कारणांमुळे कमजोर व्हायला लागते. त्यामुळे वेळीच उपाय करणे गरजेचे बनते. पण असे काही घरगुती उपाय आहेत जे केल्यास दृष्टी मजबूत होऊ शकते.
पपई, पालेभाज्या असाव्यात आहारात
डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीरात ‘व्हिटॅमिन ए’ची गरज असते. हे हिरव्या पालेभाज्या, सिमला मिरची, गाजर, पपई, आवळामधून मिळवता येऊ शकते. सुक्या मेव्यातूनही हे मिळवता येऊ शकते. त्यासाठी बदाम, मनुका आणि अंजीर हा सुका मेवा फायदेशीर ठरतो.
आहारात बदामाचा समावेश असावा
डोळ्यांसाठी बदाम खाणे फायदेशीर असते. यामध्ये आढळणारे एंटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी रोज रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठल्यावर खावेत. त्याचबरोबर तुम्ही दुधाबरोबरदेखील बदामाचे सेवन करू शकता. यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.
डोळ्यांशी संबंधित व्यायाम करावा
वारंवार डोळे स्वच्छ करणे. याशिवाय डोळ्यांशी संबंधित काही व्यायामही करणे गरजेचे आहे. डोळे वर-खाली करणे, गोल फिरवणे. याशिवाय डोळे कधीच चोळू नका किंवा खाजवू नका. मात्र, अगदीच जर डोळे जळजळ करत असतील तर कपड्यात फुंकून पाणी डोळ्यांना लावा, असे केल्यास फायदा होऊ शकतो.