पुणे: बदलेल्या जीवनशैलीत आपण अनेकदा व्हिटॅमिन्स किंवा कॅल्शियमच्या कमतरतेकडे लक्ष देतो. पण आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी मॅग्नेशियमकडे साफ दुर्लक्ष होते. विनाकारण येणारा थकवा, रात्री अचानक पायात येणारे पेटके किंवा छातीत होणारी धडधड ही या मॅग्नेशियम कमतरतेची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, ज्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर आजारांचा धोका वाढतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

मॅग्नेशियम का गरजेचे आहे?

मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. माणसाच्या श्वासोच्छवासापासून ते हृदयाच्या नियमित कार्यापर्यंत, तसेच स्नायू आणि मज्जातंतूंचे संतुलन राखण्यात मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय, शरीरातील रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे कामही हे खनिज करते.
शरीरात मॅग्नेशियम कमी झाल्यास काय समस्या उद्भवतात?
तज्ज्ञांच्या मते, मॅग्नेशियमची कमतरता शरीरात हळूहळू वाढत जाते, त्यामुळे याची सुरुवातीची लक्षणे सामान्य वाटतात. मात्र, कमतरता वाढल्यास खालील त्रास जाणवू लागतात:
-
स्नायूंचे पेटके आणि कमजोरी: रात्री झोपताना किंवा पहाटे अचानक पाय अकडणे.
-
सततचा थकवा: पुरेशी 7 ते 8 तासांची झोप घेऊनही दिवसभर अशक्तपणा आणि सुस्ती जाणवणे.
-
डोळ्यांची पापणी फडफडणे: मॅग्नेशियम कमी झाल्यामुळे मज्जातंतूंवर परिणाम होतो, ज्यामुळे वारंवार डोळे लवणं किंवा पापणी फडफडण्याचा त्रास होतो.
-
हृदयाची धडधड आणि उच्च रक्तदाब: हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा छातीत विनाकारण धडधडणे.
-
मानसिक बदल: विनाकारण चिडचिड होणे, अस्वस्थता, प्रचंड ताण येणे आणि झोप न लागणे (निद्रानाश).
मॅग्नेशियमची ही कमतरता जर दीर्घकाळ राहिली, तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. यामुळे टाईप-२ डायबिटीस, क्रॉनिक मायग्रेन, उच्च रक्तदाब आणि हाडे ठिसूळ होण्याचा आजार उद्भवू शकतो. तसेच यामुळे भविष्यात थेट हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो.
एक साधी रक्त चाचणी नेहमीच मॅग्नेशियमचे अचूक चित्र दाखवत नाही, त्यामुळे लक्षणांवरूनच याचा अंदाज घ्यावा लागतो. शरीरातील मॅग्नेशियमची पातळी नैसर्गिकरीत्या सुधारण्यासाठी औषधांऐवजी आहारावर भर देणे सोपे ठरते.
आपल्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, बदाम, काजू, अंबाडीच्या बिया, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि डार्क चॉकलेट यांचा समावेश करावा. जर लक्षणे अधिक तीव्र असतील, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन मॅग्नेशियम सप्लिमेंट्स सुरू कराव्यात.






