Health News : पुणे : लठ्ठपणा ही अशी समस्या आहे, जी प्रत्येक वयोगटातील लोकांना अनेक समस्या, आजारांना कारणीभूत ठरू शकते. परंतु, गर्भवती महिलांमध्ये, हे केवळ आईसाठीच नाही तर जन्मलेल्या मुलासाठी देखील गंभीर समस्येचे कारण ठरू शकते. ‘द जर्नल ऑफ फिजियोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे नमूद केले आहे की, गर्भधारणेदरम्यान मातेचा लठ्ठपणा आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
मातेच्या अतिरिक्त वजनामुळे प्लेसेंटाची रचना बदलते, जी आईच्या गर्भाशयात बाळाचे पोषण करते. ज्यामुळे दोघांनाही गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पण गरोदरपणात लठ्ठपणामुळे होणाऱ्या समस्या केवळ प्लेसेंटाच्या समस्यांपुरत्या मर्यादित नाहीत.
गेल्या काही वर्षांत गर्भवती महिलांमध्ये लठ्ठपणाची प्रकरणे अधिक प्रमाणात दिसू लागली आहेत. म्हणूनच आजकाल, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून, वजन जास्त वाढू नये म्हणून स्त्रियांना आहार आणि वागणुकीत काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकासाबरोबर आईचे वजन वाढते, तो लठ्ठपणा नाही. मातेच्या पोटात गर्भाचा विकास होत असताना आईच्या शरीराचा आकार बदलतो आणि वजनही वाढते हे खरे आहे. पण कधी-कधी असंतुलित आहार किंवा इतर कारणांमुळे हे वजन पाहिजे त्यापेक्षा जास्त वाढते.
दरम्यान, जो मुलाला जन्म दिल्यानंतरही बराच काळ टिकून राहतो. अशा स्थितीमुळे केवळ गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीदरम्यानच नव्हे तर प्रसूतीनंतरही आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.