पुणे, ता.२० : निरोगी राहण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. पण सर्दी, खोकला आणि ताप हे विशेष लक्ष देऊनही सतावत असतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक वाढतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक ठरतो. याच खोकल्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
खोकला हा गंभीर आजार जरी नसला तरी योग्य वेळेत यावर उपचार केल्यास फायद्याचे ठरू शकते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. खोकल्यावर घरगुती उपचार करता येऊ शकतात. त्यातून फरक पडण्याची जास्त शक्यता असते. तर जाणून घेऊया याच घरगुती उपायांबाबत…
हळदीचे दूध फायदेशीर
हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो. हळदीचे दूध पिणे खोकलाच नाही तर कित्येक आजारांवर फायदेशीर आहे. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. कोरड्या खोकल्याची समस्या अगदी काही दिवसांत कमी होईल.
सर्दी, खोकल्यावर गूळ प्रभावी
सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात.
आल्याचा रस गुणकारी
घरात असलेले आले हे खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून पाहिले जाते. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू गिळत राहा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
मधामुळे घशातील खवखव होते कमी
मधामुळे घशातील खवखव कमी होते. घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.