संदीप टूले
Health केडगाव : दौंड तालुक्यात डोळ्यांची साथ वेगाने सुरू आहे. घरोघरी डोळे आलेले रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना औषधांचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण चांगलेच बेजार झाले असून, आरोग्य यंत्रणांवर ताण पडत आहे. Health
जिवाणूंचा संसर्ग, विषाणूंचा संसर्ग यासह विविध प्रकार डोळे येण्याच्या साथीमध्ये असून, हे दोन्ही डोळ्यांचे रुग्ण बरे होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. यावर फक्त ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबद्वारे त्यावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, पूर्ण दौंड तालुक्यात आवश्यक असलेल्या ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबचा तुटवडा प्रत्येक मेडिकलमध्ये जाणवत आहे. तसेच औषधेही आवश्यतेनुसार उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्येही हेच चित्र दिसून येत आहे.
डोळे येण्याची साथ शाळांमधून देखील जास्त वेगाने पसरत आहे. शाळेतील विद्यार्थी एकत्रित येत असतात. त्यात अनेकवेळा डोळे आल्यानंतरही काही विद्यार्थी शाळेत हजर राहतात. त्यामुळे साथीचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. काही शाळा प्रशासनाकडून या संदर्भात खबरदारी देखील घेण्यात येत आहे. मात्र, त्याला देखील मर्यादा येत असल्याने संसर्ग वाढण्यास हातभार लागत आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यात मेडिकलमध्ये महत्त्वाच्या ‘आयड्रॉप’चा साठा उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य विभागाने ड्रॉपचा पुरवठा करणे फार गरजेचे असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
…म्हणून जाणवतोय तुटवडा
काही औषध विक्रेत्यांनी सांगितले की, रुग्णसंख्या अचानक वाढल्याने ड्रॉप व ॲप्लिकॅबची नियोजितपेक्षा दुपटीने मागणी वाढली आहे. डोळ्यांची साथ आल्यामुळे ड्रॉपचा तुटवडा झाला. काहीही गरज नसतानाही आधीच ड्रॉप घरी नेऊन काहीजण ठेवत आहेत. त्यामुळे हा तुटवडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.