Health पुणे : चटणी, सांबार, आमटी यांना वरून तडका द्यायचा असेल तर कढीपत्ता हा आवश्यकच असतो. कढीपत्ता केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर एकूण आरोग्य चांगले राखण्यासही मदत करतो. कढीपत्ता हा ताज्या पानांच्या स्वरूपात वापरला जातो. तसेच कढीपत्ता वाळवून त्याची पूड करूनही तीही स्वयंपाकात किंवा औषध म्हणून वापरली जाते. (Health)
भारतात आणि श्रीलंकेत कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग हा आतड्यांसंबधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी केला जातो. पण कढीपत्त्याचा शास्त्रीय स्तरावर झालेला अभ्यास सांगतो की, कढीपत्ता फक्त इतक्याच मर्यादित फायद्यांसाठी औषधी नसून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यात नत्रयुक्त घटक आणि फेनॉलिक घटक असतात. जे आरोग्याचे संरक्षण करण्यास महत्त्वाचे ठरतात. कढीपत्त्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने आरोग्य निरोगी राखण्यास कढीपत्त्याचा उपयोग होतो. (Health)
कढीपत्त्यात अ, ब, क आणि इ ही जीवनसत्त्वे असल्याने शरीराला फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी कढीपत्त्यातील या गुणधर्मांचा उपयोगी होतो. फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यामुळे गंभीर आजार ओतात. या आजारांपासून कढीपत्ता आरोग्याचं रक्षण करण्यास समर्थ आहे. कढीपत्त्याचं सेवन नियमित केल्यास हृदय रोगाशी संबंधित उच्च कोलेस्टेरॉलचा धोका टळतो. याचं कारण म्हणजे कढीपत्त्यातील गुणधर्मांमुळे ऑक्सिडेटिव्ह ताणही कमी होतो.