Health पुणे : सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलचा वापर करताना दिसत आहेत. मोबाईलच्या अति वापरामुळे मेंदूशी निगडित विकार होत असल्याचे आता समोर येत आहे. काही जणांना मोबाईलचे जणू व्यसन जडले आहे. ही मंडळी दिवसातील तासन् तास मोबाईलवर घालवत असल्यामुळे त्यांना झोपेच्या समस्या, निद्रानाश यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. (Health)
मोबाईलच्या अति वापरामुळे काम करण्याच्या एकाग्रतेवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. लोकांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झालेला आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी जितकी गरज आहे तितकाच मोबाईल वापरावा, असे डॉक्टर अनेक वेळा सांगतात. मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम मेंदूवर विविध प्रकारे होत असतो. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत असतात.
अतिवापरामुळे होतो दृष्टीवर परिणाम
मोबाईलचा वापर कमी करा. लहान वयात लहान मुलांना चष्मे लागले आहेत. त्यांच्या दृष्टीवर परिणाम होत आहे. एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर याचा परिणाम होत आहे. डिप्रेशनही अनेकांना येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर घातक आहे, याचा काळजीपूर्वक वापर लोकांनी केला पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ञ्जांकडून दिला जात आहे.
शारीरिक हालचाली होण्याचं प्रमाण कमी
मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. अनेक तास एकाच जागी मोबाईलचा वापर करत असल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. परिणामी, लठ्ठपणा वाढतो. त्यानंतर लठ्ठपणा वाढल्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये विशेष करून मधुमेह, रक्तदाबाच्या व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.