(H3N2 Virus) पुणे : इन्फ्लुएन्झाचा ‘ए’ उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’च्या विषाणूने पुण्यात दोन बळी घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामध्ये पुण्यातील एक ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर दुसरी बीडमधील ३७ वर्षीय महिला आहे. गेल्या १३ दिवसांत हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून, सोबत दोघांनाही सहव्याधी होत्या. ‘एच३एन२’मुळे पुण्यात प्रथमच दोन मृत्यू झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयात ६७ वर्षीय एच३एन२ बाधित ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू होते. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्याचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बीडच्या ‘एच३एन२ चा संसर्ग झालेल्या ३७ वर्षीय महिलेवर हडपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.२३ मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या दाेन्ही रुग्णांच्या मृत्यूचे सखाेल परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची मृत्यू पडताळणी समितीची शुक्रवारी बैठक झाली या बैठकीत तज्ज्ञ डाॅक्टरांनी या दाेन्ही रुग्णांचे उपचार, त्यांच्या मृत्यूचे कारण याचे बारकाईने परीक्षण केले असता दाेघांचाही मृत्यू ‘एच३एन२’ ने झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. म्हणजेच सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.
पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्यप्रमुख तथा साथरोग विभागप्रमुख डॉ. सुर्यकांत देवकर म्हणाले, ”या दोन्ही रुग्णांना एन्फ्लूएंझा ‘एच३ एन२’’ ची लागण झाली होती. यातील एक पुण्यातील, तर दुसरी बीडमधील महिला आहे. ती उपचारासाठी पुण्यात आली हाेती. शिवाय हे दोन्ही रुग्णांना सहव्याधी हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. या विषाणूची बाधा झाल्यावर त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.