Egg Consumption : पुणे : अंडे हा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का नियमित अंडी खाणे कितपत चांगले आहे?
आठवड्यातून सात अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते. अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पण, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, अंड्यातील कोलेस्ट्रॉलचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही. म्हणून संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात अंडी खाल्ली पाहिजेत.
त्याशिवाय २०२३ च्या एका न्युट्रिअंट्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोंबडीच्या अंड्यामध्ये कोलीन, फोलेट, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, आयोडीन आणि चांगली गुणवत्ता असणारे प्रोटीन्स असतात. पण हायपर कोलेस्ट्रॉल, अॅनिमिया व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर अंडी फायदेशीर असल्याचे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यामुळे अंड्यांचे फायदे आणि तोटे याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे. त्याशिवाय असेही समोर आलेय की, अंडी ही अत्यंत पौष्टिक, सहज उपलब्ध असणारी आणि परवडणारी आहेत.