सध्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पण काही लोकं ते करत नाहीत. मात्र, आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की ते कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करतात. याला इंग्लिशमध्ये Overthinking असं म्हटलं जातं. तुमचं हे करणं धोकादायक ठरू शकतं.
अतिविचारामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर तसेच त्याच्या शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. एखाद्या विषयावर किंवा परिस्थितीबद्दल खूप विचार करणे आणि त्याचे दीर्घकाळ विश्लेषण करणे याला अतिविचार करणे असे म्हटले जाते. ती कधी सवय होऊन जाते हे लोकांना कळतही नाही. जास्त विचार केल्याने कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी संदिग्धता, गोंधळ आणि भीती निर्माण होते. अतिविचारामुळे तणाव, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या परिस्थितीतून वेळेत सावरणे फार महत्वाचे असते.
एखाद्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल बरेच विचार मनात येऊ लागतात. हे विचार बहुतेक नकारात्मक असतात. अतिविचार करण्यामागे तणाव हे देखील एक प्रमुख कारण असू शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती तणावपूर्ण प्रसंगातून जाते तेव्हा तो सतत त्याचा विचार करत राहतो. यामुळे हळूहळू अतिविचार त्याच्याकडून केला जातो. एखादी व्यक्ती सतत स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेली असते, ज्यामुळे त्याला सावरणे कठीण होते.
अतिविचार केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. काहीवेळा नात्यांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. अतिविचार केल्याने सर्वात वाईट गृहीत धरण्याची भावना निर्माण होऊ शकते. त्याचा आपल्या आरोग्यावर इतरही अनेक प्रकारे परिणाम होतो.