नवी दिल्ली : एका संशोधनात असे दिसून आले आहे की, कोविड-१९ साथीच्या रोगासाठी जबाबदार असलेल्या विषाणूंच्या संसर्गामुळे डिस्लिपिडेमिया किंवा उच्च कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका सुमारे ३० टक्क्यांनी वाढू शकतो.
अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी या संशोधनात २० लाखांहून अधिक प्रौढांचा समावेश केला. तपासणीत दिसून आले की, रक्तातील असामान्य लिपिड पातळी साथीच्या आजारानंतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांमुळे वाढत्या मृत्यूचे रहस्य उघड करू शकते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी लिपिडची पातळी वाढणे, हा एक प्रमुख जोखीम घटक आहे.
जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, वृद्ध, प्रौढ आणि टाईप -२ मधुमेह असलेल्या लोकांना डिस्लिपिडेमिया होण्याचा धोका जवळजवळ दुप्पट वाढतो. आइन्स्टाईन कॉलेज येथील औषध आणि आण्विक औषधनिर्माण शास्त्राचे सहयोगी प्राध्यापक गेटानो म्हणाले की, गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोमशी संबंधित कोरोना व्हायरस एंडोथेलियल पेशींच्या (रक्तवाहिन्यांच्या आतील थर) कार्यात व्यत्यय आणू शकतो. त्यांनी लोकांना त्यांच्या लिपिड पातळीचे नियमित निरीक्षण करण्याचा सल्ला दिला.