लोणी काळभोर, (पुणे) : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज हिरामण काकडे यांच्या वाढदिवसानिमित मोफत आरोग्य शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (ता. १२) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरात थेऊर व परिसरातील ८०० नागरिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी दिली.
डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटल तारमळा, थेऊर काकडेमळा रोड या ठिकाणी या शिबिराचे आयोजन अष्टविनायक प्रतिष्ठान थेऊर, पै. युवराजनाना काकडे युवा मंच व मित्र परिवार थेऊर, यांच्या वतीने करण्यात आले होते.
शिबिरात सहभागी झालेल्या ४६५ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मोफत गोळ्या व औषधांचेही वाटप करण्यात आले. यावेळी १०० नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. यावेळी शिबिरातील ८ नागरिकांना विविध शस्त्रक्रियांचे निदान करण्यात आले. तसेच पुढील महिन्यात या शस्त्रक्रिया मोफत करणार असल्याचेहि युवराज काकडे यांनी सांगितले.
या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, किडनी तपासणी, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी, कान नाक घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, दातांची तपासणी, औषधे वाटप, दिव्यांग बांधवांना ओपीडी व उपयोगी वस्तू मिळणे कामी मार्गदर्शनाचे आयोजनहि करण्यात आले होते. ११० नागरिकांच्या आभा कार्डची नोंदणी केली.
या शिबिरास डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल, पिंपरी येथील नामांकित डॉक्टरांनी, येणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी केली. थेऊर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर व सर्व आशा सेविका यांनीही यावेळी येणाऱ्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी युवराज काकडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर व आशा सेविका यांचा सन्मान करून आभार मानले.
दरम्यान, शिबीर यशस्वी करण्यासाठी गेली ८ दिवस, अहोरात्र मेहनत घेणाऱ्या, अष्टविनायक प्रतिष्ठान व युवराज काकडे युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांचेही आभार यावेळी काकडे यांनी मानले.