पुणे : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समुहाच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंडमधील आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
पतंजली मार्फत मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली असून बीपी, डायबेटीस याच्यासोबत हायकोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.
मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या औषधांच्या उत्पादनसोबतच या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
केरळचे डॉक्टर के व्ही बाबू यांनी पतंजलीच्या औषधांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता.
दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचे उत्पादन केले होते. या औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या औषधांचे पुन्हा उत्पादन करायचे असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, या आदेशाची प्रत आपल्याला मिळाली नसल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटल्याच्याही काही बातम्या समोर आल्या आहेत. ही कारवाई चुकीची असल्याची आणि आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आता आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीने करण्यात आला आहे.