पुणे – लहान मुलांमध्ये दमा या आजारासंबंधी तक्रारी हिवाळ्यात जास्त वाढताना दिसून येतात. सर्दी खोकला झाला की, छातीत कफ जमायला सुरुवात होते. यामुळे छातीत घरघर होऊन धाप देखील लागू शकते. यावेळी आपल्या लहानग्यांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते.
अनेकदा लहान मुलांना सर्दी झाली की, श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे लहान मुलांच्या श्वसननलिका हा आकाराने लहान असतात. वाढणाऱ्या वयाबरोबर या श्वसननलिका मोठ्या झाल्या, की मुलांना दम लागायचे प्रमाण देखील कमी होत जाते. याच आजाराला वैद्यकीय भाषेत बालदमा असते म्हणतात. सध्याच्या घडीला या बालदम्याचे प्रमाण मुलांमध्ये जास्त असल्याचे सांगण्यात येत आहेत.
अनेकदा प्रदूषण आणि हवेतील इतर कण नाकातून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे लहान मुलांना अनेकदा सर्दी, खोकला असे आजार होतात. हिवाळ्यात या कणांचे नाकात प्रवेश करण्याचे प्रमाण जास्त असते. सातत्याने खोकला आल्याने श्वसनमालिकेवर सूज येऊ शकते.
यामुळे मुलांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते. यातूनच मुलांना श्वास बाहेर टाकताना शिट्टीसारखा आवाज येऊ शकतो. असा आवाज येत असेल तर त्या मुलांना बालदमा असण्याची शक्यता असते.
अशा मुलांना हिवाळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते. हिवाळ्यात छातीत कफ साचण्याची जास्त शक्यता असल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. श्वसननलिका ऑक्सिजन शरीरात ओढून कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकते. दम्यामध्ये श्वसननलिकेवर सूज आल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.यात श्वसन मार्गात कफ चिटकून राहिल्यास सातत्याने खोकला आल्याने लहान मुले यामुळे वैतागतात.
श्वास घेण्यास त्रास होणे, घशातून घरघर ऐकू येणे, छातीत जडपणा जाणवणे, खोकल्यातून कफ बाहेर पडणे, दम लागणे ही लक्षणे प्रामुख्याने बालदम्यात दिसून येतात. यासाठी पालकांनी मुलांकडून योगा द्वारे श्वसनाशी निगडीत आसने करून घेणे फायदेशीर आहे.
यामुळे बालदम्यासारख्या आजारापासून आराम मिळू शकातो. गरम पाण्यामुळे देखील श्वसनमालिकेचे सूज कमी होण्यास मदत होते व यामुळे कफ साचून राहात नाही.