लोणी काळभोर, ता. 17 : ‘‘पोलिस अधिकारी झाल्यानंतर गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर होतो. अतिशय कठीण परिस्थितीत तिथे काम करावं लागायचं.. केव्हा काय होईल याचा नेम नसे.. रोज किमान पंधरा किलोमीटर तरी जंगलातून चालावं लागायचं.. त्यासाठी स्वाभाविकपणे शरीराची तंदुरुस्ती आलीच…मग तेव्हापासून चालण्याची आणि फिटनेसची आवड जडली ती टिकून आहे…’ हे अनुभवाचे बोल आहेत नागपूर पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचे. मूळचे लोणी काळभोरचे सुपूत्र असणारे श्री. ननवरे हे फिटनेसचे आयकॉन झाले असून अनेकांना व्यायामाची आणि आरोग्याची प्रेरणा देत आहेत.
एपीआय शिवाजी ननवरे यांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती. ती त्यांनी पुढेही जपली. पुढे तर त्यांना त्याच आवडीतून गिर्यारोहणाचा छंदही जडला. त्यातूनच त्यांना जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टची चढाई करण्याची प्रेरणा मिळाली. तिथे त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवलाच शिवाय पोलिस दलाचा ध्वज फडकावून आपल्या कर्तव्यालाही न्याय दिला.
लहानपणापासूनच व्यायामाची आवड असल्याने व्यायामाशिवाय जीवन नाही याचे ब्रीद श्री. ननवरे यांनी जपले आहे. सायकलिंग, पोहणे, ट्रेकिंग करणे हे त्यांचे आवडते छंद आहेत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत शरीराकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिलेले नाही. ते सांगतात की वयाच्या 38 व्या वर्षी मला गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तो कोर्स मनाली येथे ए ग्रेडने पूर्ण केला. त्याचवेळी मला ट्रेल रनिंग म्हणजे डोंगरदऱ्यातील ओबड धोबाड मार्गावर धावण्याची संधी मिळाली आणि मी जास्तीत जास्त धावण्यावर भर दिला.’’
त्यानंतर श्री ननवरे यांनी कात्रज टू सिंहगड ट्रेल धावणे किंवा ट्रेकिंग करणे, 30 किलो वजन घेऊन 50 मिनिटांत सिंहगड चढणे, असं सतत व्यायाम करून स्वत:ची क्षमता विकसित केली. त्यानंतर लवकरच कांगयासे- 2 हे शिखर सर करण्याचे आव्हान पेललेच, शिवाय 17 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले, 30 मे रोजी माउंट मकालू हे शिखर सर गेले आणि 24 सप्टेंबर रोजी मनासलू शिखर सर केले. विशेष म्हणजे मनास्लू सारख्या मोहिमेत कॅम्प चार वरून समिट पुश केला जात असताना शिवाजी कॅम्प तीन पासून समिट करणारी कामगिरी करून दाखवली. त्यातूनच गिर्यारोहणात एका मोसमात एकाहून जास्त अष्टहजारी शिखरे सर करण्याचा नवा पांयडा त्यांनी निर्माण केला आहे.
पोलिसांत कर्त्यव्याला पाहिजे, तर तुम्हाला फिटनेस पाहिजे हे ओघाने आलंच, पण इतर क्षेत्रातही फिटनेस असायलाच हवा, असे ननवरे यांचे परखड मत आहे. नियमित व्यायाम करून तुम्ही शरिराची तंदुरुस्ती नुसती राखायची नाही, तर क्षमताही वाढवायची असते, असा सल्ला ते संपर्कात येणाऱ्याला देतात. लवकरच आपण पुन्हा दररोज १५ किलोमीटर चालायला सुरूवात करणार आहोत, असेही ते आवर्जून सांगतात.
दररोज व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करताना एपीआय शिवाजी ननवरे म्हणतात की तुम्ही रोज मैदान, जिम, जॉगिंग ट्रॅक, किंवा टेकडी अशा ठिकाणी गेला नाही, तर तुमच्या बॉडीची स्थिती आदल्या दिवसाच्या तुलनेत कशी होती याचे ऑडिट होणार नाही. तुम्ही एक दिवसाआड आठवड्यातून एकदा महिन्यातून तीनदा किंवा जमेल तसे गेला, तर ऑडिट नीट होणार नाही, बॉडीच्या क्वेरी काय आहेत हे करण्यासाठी ऑडिट रोजच्या रोज करावे असा फिटनेसचा मंत्र स्वत:चा फिटनेस जपत ते देत आहेत.